Monday , June 8 2026
Breaking News

….म्हणे बेळगाव कर्नाटकाचाच भाग; संरक्षणासाठी कोणताही संघर्ष करण्यास तयार : डॉ. अल्लमप्रभू महास्वामी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव आणि कन्नड भाषेच्या संरक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करण्यास तसेच प्रसंगी प्राणत्याग करण्यासही आपण तयार असल्याची ठाम भूमिका नागनूर येथील रुद्राक्षी मठाचे पीठाधीश डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांनी व्यक्त केली.

सोमवारी रुद्राक्षी मठात विविध कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी सीमावाद, भूमी व जलसंपत्तीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांनी बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार केला.

यावेळी त्यांनी सांगितले की, लिंगैक्य शिवबसव महास्वामी यांनी बेळगाव कर्नाटकात कायम राहावे यासाठी मोठा संघर्ष केला होता. त्यांच्या योगदानाची आठवण आजही जिवंत असून, त्यांनी सहन केलेल्या अत्याचारांची स्मृती ताजी आहे. अनेक वर्षांनंतर पुन्हा अशाच प्रकारच्या आंदोलनाची वेळ येणे दुर्दैवी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

कन्नड हितरक्षणाच्या प्रश्नांवर रुद्राक्षी मठ गेल्या अनेक दशकांपासून अग्रस्थानी राहिल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, बेळगाव कर्नाटकाचाच भाग असल्याबाबत कोणतीही शंका नसताना पुन्हा ते सिद्ध करण्याची वेळ येणे खेदजनक आहे.

बेळगाव महानगरपालिकेने ‘बेळगाव कर्नाटकाचाच भाग आहे’ असा ठराव मंजूर करण्याबाबत घेतलेली भूमिका प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची टीकाही त्यांनी केली. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला रुद्राक्षी मठाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत, या विषयावर महापौर व उपमहापौर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, कन्नड कार्यकर्ते अशोक चंदरगी यांनी महानगरपालिकेच्या भूमिकेवर टीका करत, कन्नडच्या समर्थनार्थ ठराव मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला.

बैठकीस महादेव तळवार, श्रीनिवास ताळूकर, बलराम मासेनट्टी, वाजिद हिरेकोडी, महानगरपालिका सदस्य रमेश सोंटक्की, दिनेश नाशिपुडी, साहित्यिक नीलगंगा चरंतिमठ यांच्यासह सुमारे २० कन्नड संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘प्यास’कडून तारिहाळ येथील ऐतिहासिक विहिरीचा जीर्णोद्धार सुरू

Spread the love  बेळगाव : तारिहाळ येथील ऐतिहासिक बडेकोळ्ळ मठ परिसरातील शतकाहून अधिक जुनी विहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *