बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस बेळगाव शहरातील विवेकानंद मार्ग (रिसालदार गल्ली) येथील स्वामी विवेकानंद स्मारकात वास्तव्य केले होते. त्या पावन दिनाच्या स्मरणार्थ येत्या बुधवार दि. 16 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विवेकानंद स्मारक जनतेसाठी खुले ठेवण्यात येणार असून शहरवासीयांनी स्मारकाला भेट देऊन विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे जाहीर निमंत्रण रामकृष्ण मिशन आश्रम बेळगावने दिले आहे.
शहरातील रिसालदार गल्ली येथील तत्कालीन नामवंत वकील सदाशिव बाळकृष्ण भट यांच्या निवासस्थानी (सध्याचे स्वामी विवेकानंद स्मारक) स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 रोजी पदार्पण करून तेथे तीन दिवसाचे वास्तव्य केले होते. सदर घटनेला आता 125 वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र त्या पावन दिनाच्या स्मरणार्थ येत्या बुधवारी 16 ऑक्टोबर 2024 रोजी रामकृष्ण मिशन आश्रम बेळगावतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्वामी विवेकानंदन मार्ग येथील स्वामी विवेकानंद स्मारक सर्वांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी स्मारकाला भेट देऊन स्वामीजींचा आशीर्वाद घ्यावा व प्रसाद ग्रहण करावा असे जाहीर निमंत्रण देण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंद स्मारकात त्याच दिवशी म्हणजे बुधवारी सायंकाळी 5:45 ते 7:15 वाजेपर्यंत सार्वजनिक सभा अर्थात कन्नड व मराठी भाषेत भजन आणि प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर रात्री 8:45 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत रंगपुत्थळी कठपुतळी संघ बेंगलोर यांच्याकडून स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित कळसुत्री बाहुल्यांचा खेळ सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमानंतर रात्री 8:45 ते 10 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून समस्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन रामकृष्ण मिशन आश्रम बेळगावतर्फे करण्यात आले आहे.