Sunday , July 26 2026
Breaking News

कडोली साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर

Spread the love

 

बेळगाव : कडोली येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे होणाऱ्या 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत व व्याख्याते प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांची निवड झाली आहे. रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे.
रविवारी (ता. 29) रात्री झालेल्या साहित्य संघाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष भरमाणी डोंगरे होते. यावेळी संमेलनाच्या रूपरेषेबाबत चर्चा झाली. यावेळी बसवंत शहापूरकर, अरुण पाटील, गिरीधर गौडवाडकर, विलास बामणे, शिवाजी कुट्रे, तानाजी कुट्रे, दीपक होनगेकर आदींनी विविध सूचना मांडल्या.
डॉ. लुलेकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख आहेत. यापूर्वी विद्रोही साहित्य संमेलन (हिंगोली), मराठवाडा युवक साहित्य संमेलन (मरडगाव) 18 वे नरहर कुरुंदकर साहित्य संमेलन (नांदेड), दुसरे मराठी साहित्य संमेलन (शिरूर अनंतपाळ), पहिले मराठवाडा युवा साहित्य संमेलन (औरंगाबाद) आदी साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
वेध आणि वेधक, साहित्याचे वर्तन आणि वर्तमान, भंजनाचे भजन, साहित्याचे सांस्कृतिक संचित, साठोत्तरी साहित्य प्रवाह, पंचधारांचा प्रदेश, मोगडा, बलुतेदार, गावागाड्याचे शिल्पकार, बलुतेदारांची हत्त्यारे आणि अवजारे, आले ढग गेले ढग (कविता संग्रह), अनंत पैलुंचा सामाजिक योद्धा, बहुजन संस्कृतीचे जनक : महात्मा फुले, भूमिकांचा ऐवज यासह सुमारे 40 ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. अनेक ग्रंथांचे संपादन तसेच अन्य भाषातील कांही पुस्तकांचा अनुवादही त्यांनी केला आहे.
अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांगमय निर्मितीचे दोन पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा साहित्य पुरस्कार, लातूरचा अण्णाभाऊ साठे साहित्य भूषण पुरस्कार, अंबेजोगाई येथील नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे. दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर एक हजाराहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. तसेच अन्य विविध विषयांवरही त्यांची व्याख्याने झाली आहेत. एक उत्तम वक्ते म्हणून ते परिचित आहेत.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *