बेळगाव : ॲड. श्रीधर कुलकर्णी हे त्यांच्या एका अशीलासोबत कोर्टाच्या आदेशानुसार, सरफेसी कायद्यांतर्गत पोलीस संरक्षणाची मागणी करण्यासाठी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यावेळी स्टेशन हाऊस ऑफिसर सुनगार यांनी कुलकर्णी यांच्या मागणीला कोणताही प्रतिसाद न देता उलट त्यांना अपमानित केले असा आरोप वकिलांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर सुनगार यांनी ॲड. कुलकर्णी यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा गंभीर करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ॲड. श्रीधर कुलकर्णी यांनी सांगितले कि, एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत आपण तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ केली. शिवाय आपल्याला अर्वाच्च भाषेत उत्तर देत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयीही हीन पातळीची भाषा वापरली. आपल्यासोबत झालेल्या या प्रकाराबद्दल आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी आपण पोलीस आयुक्तांकडे केल्याचे ते म्हणाले.
पोलीस आयुक्त यांनी वकील संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली आणि घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, वकील संघटनेचे सदस्य केवळ तोंडी माफीवर समाधानी नसून, त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.