बेळगाव : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी महत्वपूर्ण असलेल्या नीट घोटाळाप्रकरणी गुजरातमधील राजकोट पोलिसांनी बेळगावातील एका इंटरनॅशनल स्कूलचे चालक असलेल्या मनजीत जैन यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे.
राजकोटमधील गुन्हे अन्वेषण विभागाने नीटमध्ये गुण वाढवून देणाऱ्या टोळीचा शुक्रवारी (दि. ९) रोजी पर्दाफाश केला. त्यात शिक्षण सल्लागार विपुल तेरैया, राजकोटमधील रॉयल अकॅडमी या कोचिंग क्लासचा संचालक राजेश पेठाणी, सुरतमध्ये शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र चालवणारा व तेरैय्याचा भाऊ प्रकाश, बेळगावात सीबीएसई परीक्षा समन्वयक म्हणून काम करणारा मनजीत जैन व उदयपूरमधील धवल संघवी यांचा समावेश आहे. उपरोक्त टोळीकडून १५ ते २० लाख रुपये घेऊन नीटच्या गुणात फेरफार करुन ते वाढवून देण्यात येत होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडून असा प्रकार सुरु असल्याची माहिती राजकोटच्या गुन्हे शाखेचे डीसीपी डॉ. पार्थराजसिंग गोहिल यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मनजीत जैन व विपुल तेरैया हे दोघे या घोटाळ्यामागील मास्टरमाईंड आहेत. अशा प्रकारे या टोळीने तब्बल ३० विद्यार्थ्यांकडून रक्कम वसूल करुन त्यांना नीटमध्ये वाढीव गुण देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी फक्त गुजरातमध्येच नव्हे तर महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, दिल्ली, राजस्थानमधील तरुणांनाही गंडा घातला आहे. कर्नाटकातील किती तरुण यामध्ये अडकले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी कर्नाटकसह बेळगावातील तरुणही आमिषाला बळी पडल्याचा संशय आहे.