खानापूर : विश्वभारती कला क्रीडा संघटनेतर्फे 1 जून रोजी खानापूर तालुक्यातील आबनाळी येथे खुली कारगिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नुकताच झालेल्या विश्वभारती क्रीडा संघटनेच्या बैठकीत तिसरी कारगिल खुली मॅरेथॉन स्पर्धेसंदर्भात तालुक्यात जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर स्पर्धा 1 जून रोजी सकाळी सात वाजता घेण्यात येणार आहे. याबाबत बोलताना अनिल देसाई म्हणाले की, मुलांना बालवयातच शिक्षणासोबत क्रीडा स्पर्धांची देखील आवड निर्माण व्हावी या हेतूने ही मॅरेथॉन स्पर्धा घेतली जात आहे. विश्वभारती कला क्रीडा संघटना वर्षभरात विविध उपक्रम राबवीत असते. खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आबनाळी सारख्या दुर्गम भागात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये 8 किलोमीटरसाठी 18 ते 35 वर्षांवरील महिला व पुरुष, अंगणवाडी मुलांना 25 मीटर धावणे, पहिली ते दुसरी 50 मीटर धावणे, तिसरी ते चौथी 100 मीटर धावणे, पाचवी ते सहावी 200 मीटर धावणे, सातवी ते आठवी 400 मीटर धावणे, नववी ते दहावी 800 मीटर धावणे, अठरा वर्षावरील महिला 200 मीटर धावणे, जेष्ठ नागरिक पुरुष 200 मीटर धावणे अशा स्वरूपात ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील नागरिकांनी, युवा पिढीने व शालेय विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.