रायबाग : रायबाग तालुक्यातील कंकणवाडी गावाच्या बाहेर, निप्पाणी-मुधोळ राज्य महामार्गावर बुधवारी सायंकाळी हा दुर्दैवी अपघात झाला. मुत्तूराज मुगळखोड (वय ५) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मुत्तूराज मुगळखोड हा बुधवारी आपल्या बहिणींसोबत नागानूर शहरातील समर्थ कन्नड आणि इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत पहिल्यांदाच गेला होता. सायंकाळी शाळेच्या वाहनाने विद्यार्थ्यांना त्यांच्या घराशेजारील महामार्गावर उतरवले. मुत्तूराज इतर विद्यार्थ्यांसोबत रस्ता ओलांडत असताना, एका दुचाकीने त्याला धडक दिली. धडकेने तो खाली पडला आणि त्याचवेळी दुसऱ्या एका वाहनाने त्याला चिरडले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या शाळेच्या वाहनचालकाने आपले वाहन तिथेच सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शाळेत गेलेला आपला मुलगा जिवंत घरी परतलाच नाही या धक्क्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अपघात घडवून पळून गेलेल्या दुचाकीस्वार आणि कार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.