बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखाना लीजवर देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, बेळगाव जिल्ह्यातील एका बड्या राजकीय व्यक्तीच्या हातात हा कारखाना सोपवण्यासाठी संचालक मंडळातील काही संचालकांनी गडबड सुरू केली आहे.
7 जून रोजी संचालक मंडळातील काही सदस्यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीच्या घरी जाऊन कारखाना लीजवर घ्यावा असे साकडे घातले आहे. मध्यंतरीच्या काळात काही व्यवसायिकांनी हा कारखाना चालविण्यात रस दाखविला होता. जवळपास सात वर्षांसाठी हा कारखाना हाती घेऊन कारखान्याचे सर्व कर्ज फेड करण्याची देखील तयारी दाखवली जात होती. परंतु संचालक मंडळातील काहींना हा कारखाना मराठी भाषिकांच्या हातात ठेवायचा नसून राजकीय व्यक्तींच्या हाती सोपवण्यात स्वारस असल्याचे दिसून येत आहे.
मराठी माणसाचे वर्चस्व असलेल्या काही मोजक्याच सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यावर 200 कोटी रुपयांवर बोजा आहे. त्यातच हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी काही राजकीय इच्छाशक्ती पुढे आलेल्या आहेत. तीस कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्यास कारखाना यंदाच्या वेळेत हंगामात चालू केला जाऊ शकतो. पण संचालक मंडळाची इच्छाशक्ती केवळ हा कारखाना लिजवर देण्यापूर्तीच मर्यादित राहिली असल्याने कारखाना राजकीय व्यक्तीच्या हातात जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.