नवी दिल्ली : अहमदाबादमधील विमान अपघातात 250 जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादवरुन लंडनला जाणारे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात कोसळले. ज्यामध्ये विमानात असलेल्या 241 प्रवाशांसह काही विद्यार्थ्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातातील मृत प्रवाशांमध्ये केरळमधील एका नर्सचाही समावेश होता, ती नोकरीनिमित्त लंडनला जात होती. मात्र तिचा अपघातात मृत्यू झाला. नर्सचे नाव रंजिता असे आहे. ती केरळमधील रहिवासी आहे. तिच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्याबद्दल फेसबुकवर अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल केरळमधील एका सरकारी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. कासरगोड जिल्ह्यातील वेल्लारीकुंडू तालुका कार्यालयातील कनिष्ठ अधीक्षक ए पवित्रन असे या निलंबित अधिकाऱ्याचे नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ अधीक्षक ए पवित्रन यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पठाणमथिट्टा येथील रंजिता यांची खिल्ली उडवली होती. याची दखल राज्याचे महसूल मंत्री के राजन यांनी घेत ए पवित्रन यांच्या फेसबुक पोस्टचे वर्णन “अपमानजनक” असे केले आणि या अधिकाऱ्याला निलंबित केले.
ब्रिटनमध्ये करायची काम
दोन मुलांची आई असलेली रंजिता ही ब्रिटनमध्ये नर्स म्हणून काम करत होती. काही काळ परदेशात राहिल्यानंतर ती केरळमधील सरकारी सेवेत पुन्हा रुजू होण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी केरळमध्ये आली होती. मात्र लंडनला परत जाताना तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी पठाणमथिट्टा जिल्ह्यातील पुल्लाड येथील रंजिता यांच्या घरी पोहोचून तिच्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.