

मच्छे (ता. बेळगाव) : सतत सुरु असलेल्या घरगुती वादातून संतापलेल्या पत्नीने पतीच्या अंगावर चक्क उकळते तेल ओतल्याची धक्कादायक घटना रामनगर (मच्छे) येथे सोमवारी घडली आहे. या घटनेत पती सुभाष पाटील (वय 55) हे गंभीर भाजल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी वैशाली पाटील स्वयंपाक करत असताना किरकोळ कारणावरून पती सुभाष यांच्याशी वाद झाला. वादाच्या भरात वैशालीने रागाच्या झटक्यात कढईभर उकळते तेल थेट सुभाष यांच्या डोक्यावर ओतले. या घटनेत सुभाष यांच्या डोक्याला, चेहऱ्याला व शरीराच्या विविध भागांना भाजल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. वेदना असह्य झाल्यामुळे सुभाष पाटील यांनी तत्काळ पाण्याच्या टाकीत उडी घेतली होती. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सुभाष आणि वैशाली पाटील हे दोघेही माजी ग्रामपंचायत सदस्य असून, खानापूर तालुक्यातील बिदरभावी हे मूळ गाव आहे. दोघांनीही प्रेमविवाह केला असून, गेल्या काही वर्षांपासून मच्छे (रामनगर) येथे स्थायिक झाले होते. येथे त्यांचा घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे.
मागील दोन वर्षांपासून या दाम्पत्यामध्ये सतत वाद सुरू असल्याचे स्थानिकांकडून समजते. सोमवारी झालेल्या वादात पत्नीने संतापाच्या भरात हा जीवघेणा प्रकार केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी वैशाली पाटील यांच्याविरुद्ध पतीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta