Sunday , September 20 2026
Breaking News

प्रबोधनकार वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने बेळगावातील तरुणाईचे डोळे पाणावले

Spread the love

 

बेळगाव : आई-वडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या सुखाची होळी करतात, मात्र आधुनिकतेच्या नावाखाली आजची पिढी पालकांच्या त्याच कष्टांचा विसर पडत चालली आहे. प्रसिद्ध समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांनी मांडलेल्या या दाहक वास्तवाने आज बेळगावची तरुणाई गहिवरली.

श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधनपर कार्यक्रमात हंकारे यांनी ‘पालकांच्या वेदना’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. “केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून चालणार नाही, तर तरुणांमध्ये नैतिक मूल्ये आणि संस्कारांची रुजवण होणे ही काळाची गरज आहे,” असे मत कोंडुसकर यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले. आजचा तरुण मोबाईल, व्यसनं आणि पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली भरकटत चालला असून, त्याला पुन्हा सन्मार्गावर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

वसंत हंकारे यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत आई-वडिलांच्या कष्टांचे चित्रण केले. आई-वडिलांच्या अपेक्षा आणि मुलांचे वाढते स्वातंत्र्य यामुळे निर्माण होणारी दरी कशी घातक ठरू शकते, याचे अनेक दाखले त्यांनी दिले. संस्कारहीन जीवन तरुणाईला विनाशाकडे घेऊन जात असून, धर्माची आणि नैतिकतेची जोड असेल तरच तरुण पिढी सक्षम होईल, असा मोलाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

यावेळी हंकारे यांनी मांडलेले विचार ऐकून मैदानावर उपस्थित असलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मोबाईल आणि आभासी जगात गुरफटलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपली चूक मान्य करत, इथून पुढे पालकांचा आदर आणि मेहनतीने अभ्यास करण्याचा संकल्प केला. या भव्य कार्यक्रमाला बेळगाव शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *