Monday , April 20 2026
Breaking News

विधायक कार्याचा सन्मान हा वेदांत फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

Spread the love

 

महापौर पवार; आदर्श पत्रकार, शिक्षक, पोलिस ‘एक्सलन्स पुरस्कारा’ने सन्मानित

बेळगाव : समाजात विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांना अधिक जोमाने काम करण्यास प्रेरणा देण्याचे स्तुत्य कार्य वेदांत फाऊंडेशनने हाती घेतले आहे. पत्रकार, शिक्षक व पोलिसांप्रमाणेच पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांचाही गौरव व्हावा, असे आवाहन महापौर मंगेश पवार यांनी केले.

वेदांत फाऊंडेशनतर्फे शनिवारी टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात आदर्श शिक्षक, पत्रकार व पोलिसांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ‘एक्सलन्स पुरस्कार’ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक आर. एम. चौगुले होते.

महापौर पवार यांनी प्लास्टिकमुक्त बेळगावसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन केले. शिक्षकांचे ज्ञानदान, पत्रकारांचे समाजप्रबोधन आणि पोलिसांची कायदा-सुव्यवस्था यांमुळेच सुदृढ, शिस्तबद्ध व जागरूक समाज घडतो, असे रोटरी क्लबचे प्रांतपाल तथा उद्योजक अशोक नाईक यांनी सांगितले.

उपमहापौर वाणी जोशी यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. फास्ट फूड संस्कृतीमुळे वाढणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत नागरिकांनी जागरूक राहावे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी गुन्हे व वाहतूक विभागाचे डीसीपी निरंजनराजे अर्स, आर. एम. चौगुले, झुआरी अ‍ॅग्रो केमिकलचे माजी उपायुक्त आर. वाय. पाटील, संतोष जैनोजी, लिंगराज जगजंपी, वीरेश किवडसण्णावर आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार बी. बी. देसाई, पत्रकार जितेंद्र शिंदे व विलास जोशी, शिक्षक शेखर करंबेळकर, युवराज रत्नाकर, कल्लाप्पा पाटील, उमेश बाळेकुंद्री, पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील व हेड कॉन्स्टेबल श्रीकांत उप्पार यांना रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

पत्रकारांच्या वतीने बी. बी. देसाई, तर शिक्षकांच्या वतीने शेखर करंबेळकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सी. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले, जयश्री पाटील, सतीश पाटील यांनी पाहूण्याचा परिचय करून दिला. हेमा अंगडी, आस्मा नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सविता चंदगडकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *