Sunday , July 26 2026
Breaking News

चालत्या ट्रकच्या चालकावर प्राणघातक हल्ला

Spread the love

 

बेळगाव : शहरातील क्लब रोड परिसरात भररस्त्यात झालेल्या थरारक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ अपघाताच्या रागातून आठ जणांच्या टोळीने चालत्या ट्रकचा पाठलाग करून चालकावर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या हल्ल्यात रुक्मिणी नगर, बेळगाव येथील रहिवासी अयाज सवणूर (वय ३६) हा ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंडलगा परिसरात अयाजच्या ट्रकचा एका कारला धक्का लागला होता. मात्र अपघातानंतर ट्रक न थांबवता पुढे नेल्याच्या रागातून संबंधित कारमधील आठ जणांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला.

क्लब रोडवरील शंकरानंद पुतळ्याजवळ हल्लेखोरांनी ट्रकला ओव्हरटेक करून चालत्या ट्रकमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अयाजच्या मांड्या, कान, पाठ आणि डोक्यावर चाकूने वार करण्यात आले. याचवेळी ट्रकवर दगडफेक करून काचा फोडत परिसरात मोठा गोंधळ घालण्यात आला.

गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अयाजला तातडीने खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. आपल्या मुलाची ही अवस्था पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून पालकांनी हंबरडा फोडला.

गुजरातहून माल भरून बेळगावमार्गे शिनोळी येथे जात असताना हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येते. ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाला गंभीर दुखापत झाली आहे, अशी माहिती ट्रक मालकाने दिली.

या घटनेची माहिती लोकांनी फोनवरून दिल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. तोपर्यंत पोलीस दाखल झाले होते. हल्लेखोर कोण होते, याची माहिती अद्याप नाही. हा चालक गेल्या १८ ते २० वर्षांपासून आमच्याकडे काम करत असल्याचे ट्रक मालक मुस्तफा सवणूर यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलीस आणि ‘सोको’ पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींच्या अटकेसाठी पोलीसांनी जाळे पसरवले असून कॅम्प पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *