Friday , April 17 2026
Breaking News

दलित आमदारांविरोधी षडयंत्राविरोधात पक्षभेद विसरून एकत्र या : आम. रमेश जारकीहोळी

Spread the love

 

बेळगाव : राज्यात दलित आमदारांविरुद्ध सातत्याने अन्याय आणि षडयंत्र रचले जात असून, या विरोधात सर्वच पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडे आता प्रशासकीय पकड आणि ताकद उरलेली नाही, असे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रमेश जारकीहोळी यांनी गेल्या २५ वर्षांपासून दलित लोकप्रतिनिधींवर अन्याय होत असल्याचे सांगितले. आमदार चंद्रू लामाणी यांच्या विरोधात त्यांच्याच समाजातील व्यक्ती आणि स्वामीजींनी मिळून कट रचला आहे. जर लामाणी दोषी असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई व्हावी, मात्र या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. तसेच धारवाडचे सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता सुरेश यांच्यावर निवृत्तीच्या दिवशीच झालेली कारवाई खेदजनक असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. आम्हालाही दाबण्याचा प्रयत्न झाला, मात्र आम्ही संघर्षातून बाहेर पडलो आहोत. राज्य सरकार सध्या लूट करत असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आता केवळ एका विशिष्ट समाजाचे नेते राहिले आहेत. ते २०१३-१४ मध्ये जसे होते तसे आता राहिलेले नाहीत आणि त्यांच्यात मुख्यमंत्रीपद चालवण्याची शक्ती उरलेली नाही, अशी टीका रमेश जारकीहोळी यांनी केली.

बनावट जात प्रमाणपत्रांच्या तक्रारीवर कारवाई होत नसल्याबाबत बोलताना २०२८ मध्ये आमचे सरकार आल्यावर मी काय असते ते दाखवून देईन, असे आव्हान त्यांनी दिले. काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चेवर बोलताना जारकीहोळी म्हणाले की, केवळ पोस्टर लावून किंवा टीव्हीवर बोलून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. मग तो रमेश असो वा सतीश जारकीहोळी, मुख्यमंत्री होण्यासाठी पोषक वातावरण लागते, असे रमेश जारकीहोळी यांनी नमूद केले. भाजपला सध्या कोणाचीही गरज नसून आम्ही कोणालाही पक्षात येण्याचे निमंत्रण दिलेले नाही. बेळगावपासून बीदरपर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थित केल्यास २०२८ च्या निवडणुकीत भाजप १२० जागा जिंकून बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा शिवसेनेकडून सत्कार

Spread the love  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश मरगाळे यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *