चंदगड : सीमाभागातील अडीअडचणी समजून घेऊन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदैव सीमाभागातील जनतेच्या पाठीशी असल्याचे मत राज्याचे उत्पादन शुल्क व परिवहन मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले. शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील बाळासाहेबांची शिवसेना प्रणित शिवशाही युवा आघाडीच्या प्रचारसभेत शुक्रवारी ते बोलत होते. मारुती बेळगावकर यांनी शिनोळी गावच्या समस्या प्रास्ताविकातून व्यक्त केल्या.
मंत्री शंभूराजे देसाई पुढे म्हणाले की, चंदगडची भौगोलिक रचनाही आपल्या पाटण मतदारसंघातप्रमाणेच आहे. त्यामुळे मतदारसंघातील समस्यांची मला जाण असून चंदगडचे मागासलेलेपण पुसण्यासाठी शिंदे सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देऊ, असे आश्वासन देऊन तालुक्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच शिंदे-फडवणीस सरकारने नेहमीच सीमाभागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारकडून ८६५ गावांना योजनांच्या माध्यमातून मिळणारा निधी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात बंद करण्यात आला. पण शिंदे-फडणवीस सरकार येताच त्या पुन्हा सुरू करून सीमाभागातील मराठी भाषिकांना दिलासा दिला आहे.
तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची घेऊन सीमाप्रश्नी सर्वाच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत यापुढील काळात दोन्ही राज्यांनी सामंजस्यांची घ्यावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे आम्ही यापुढील ती काळजी घेऊन मराठी भाषिकांच्या पाठीशी राहू, असे त्यांनी सांगितले.
‘मराठी भाषिकांसाठी लवकरच हेल्पलाईन’
सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र सरकारने हेल्पलाईन सुरू करावी, जेणेकरून आमच्या समस्या त्यावर मांडता येईल, अशी विनंती बेळगावमधील एका मराठी भाषिक युवकांनी केली असता लवकरच ती सुरू करू, असे आश्वासन दिले.
तत्पूर्वी त्यानंतर माजी सरपंच नितीन पाटील यांनी आपण केलेल्या विकासकामांचा आढावा घेत राहिलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा शिवशाही युवा आघाडी साथ द्या,असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उमेश पाटील, दिवाकर पाटील, कल्लाप्पा निवगिरे, विनोद पाटील, रघुनाथ गुडेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.