तेऊरवाडी (एस. के. पाटील) : उत्साळी (ता. चंदगड) येथे दि. ६ जून पासून ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा संपन्न होत आहे. डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या अधिष्ठानाखाली संपन्न होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. ८ जून रोजी कळस व श्री भावेश्वरी देवीची फुलानी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून भव्य संपूर्ण गावभर भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीची सुरूवात विनायक देसाई, विश्वासराव देसाई, गोपाळ देसाई आदि मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आली. विनापूजन मल्हारी देसाई व गणपत जाधव यांनी केले. दिंडी मार्गदर्शन विठोबा गावडे व भजनी मंडळ सदावरवाडी यांनी केले. यावेळी संपूर्ण गावात भगव्या पताका लावून व दारोदारी रांगोळीचा सडा टाकून सजवले होते. गावातील सर्व पुरूषानी पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान केली होती. तर महिला व युवतीनी एकाच रंगाच्या साड्या परिधान करून डोईवर भरलेला कलश घेऊन या मिरवणूकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. प्रत्येकाच्या मुखात हरिनाम व टाळ मृदूंगाचा गजर गजर करत भावेश्वरीची मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये उत्साळीतील सर्व अबाल वृद्धासह माहेरवासिनी दुरड्या घेरून सहभागी झाल्या होत्या. गेले चार दिवस उत्साळीतील वातावरण भक्तीमय झाले आहे.
