खानापूर : रानडुकराच्या हल्ल्यात खानापूर तालुक्यातील चापोली गावचा 70 वर्षीय वृद्ध शेतकरी जखमी झाला आहे. त्याच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
गंगाराम धुळू शेळके असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
गंगाराम हे गवळीवाड्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतात जात होते. काही अंतरावर गेले असतानाच रानडुकराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हातात काठी घेऊन गंगाराम यांनी त्या रानडुकराचा प्रतिकार केला. यावेळी झालेल्या झटापटीत गंगाराम जखमी झाले. मात्र, त्यांच्या प्रखर प्रतिकारामुळे डुक्कर जंगलात पळून गेले.
डुकराच्या हल्ल्यात गंगाराम यांच्या पायाला आणि मांडीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.