खानापूर : खानापूर तालुका परिसरात आज दुपारच्या दरम्यान झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे, खानपूर-नंदगड रस्त्यावर करंबळ गावाजवळ एक मोठे झाड कोसळले. या घटनेमुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक एक तासाहून अधिक काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने, या घटनेच्या वेळी झाडाखाली कोणतीही व्यक्ती किंवा वाहन नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाड रस्त्यावर आडवे पडल्याने खानापूर-नंदगड मार्गावरील दुहेरी वाहतूक पूर्णपणे थांबली. याचा फटका अनेक वाहनचालक आणि प्रवाशांना बसला. सुमारे एक तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच करंबळ गावातील ग्रामस्थ आणि वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने झाड कापून रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम सुरू केले. ग्रामस्थ आणि वनविभागाच्या एकत्रित प्रयत्नाने अखेर रस्ता मोकळा करण्यात आला आणि सुमारे दीड तासानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.