खानापूर : खानापूर तालुक्यात आज सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. याचदरम्यान चापगांव येथील शेतवडीत सोमवार दिनांक 12 रोजी सायंकाळी वीज कोसळल्याने एका धनगराची 11 बकरी मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर धनगराचे नाव उमेश यल्लाप्पा चिचडी, राहणार होण्णनूर तालुका बैलहोंगल असे आहे.
चापगांव येथील मानीतील तलाव परिसरातील शेतवडीत हंपन्नावर यांच्या शेतवडीत सदर धनगराची वस्ती होती. सायंकाळी चारच्या सुमारास चापगांव व परिसरात वीज-वादळ व गडगडाटासह जोराचा पाऊस झाला. यावेळी वीज पडल्याने धनगराची अकरा बकरी जागीच ठार झाली. त्यामुळे सदर धनगराचे जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच याच परिसरामध्ये असलेले ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष मारुती चोपडे यांच्या शेतवडीत असलेल्या घरावर विजेचा प्रभाव पडल्याने घरातील टीव्ही, इन्व्हर्टर, फॅन व संपूर्ण वीजेची उपकरणे जळून गेली आहेत. तसे परिसरातील आजूबाजूच्या घरातीलही विद्युत उपकरणे जळाल्याची घटना घडली आहे. वारा, पाऊस व विजेमुळे चापगाव येथील अनेकांचं नुकसान झाले आहे. पावसामुळे वीज पुरवठा ही काही काळ खंडीत झाला होता. सदर घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात झाली आहे.