खानापूर : बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी पूल खचल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक रविवारी सायंकाळपासून पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी दिवसभर पर्यायी खचलेल्या रस्त्यावर दगड, माती टाकून काँक्रीट घालून सदर रस्ता मंगळवारपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी खुला केला आहे.
बेळगाव-जांबोटी-गोवा अशी वाहतूक खानापूर व बैलूरमार्गे वळविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दहा पाईप घालून पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. परंतु रविवार दि. ८ रोजी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी अचानकपणे आमटे येथील बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने दुसऱ्यांदा रस्ता खचला. रविवारी सायंकाळपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून इतर मार्गे वळविली होती. सध्या रस्त्याची दुरुस्ती करून या मार्गावरून केवळ चारचाकी व दुचाकी वाहनांना मुभा दिली आहे. नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहतूक व बस वाहतूकसुद्धा बंद राहणार आहे.