Friday , October 23 2026
Breaking News

खानापूर तालुका पंचायतमध्ये पाच गॅरंटी योजनांचा आढावा

Spread the love

 

खानापूर : तालुका पंचायत खानापूर येथे आज पाच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. बैठकीस तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी रमेश मैत्री तसेच गॅरंटी योजना समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये पाचही गॅरंटी योजनांच्या प्रगतीचा संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत समितीच्या सदस्यांनी प्रश्न उपस्थित करून त्यावर सविस्तर चर्चा केली.

शक्ती योजनेचा आढावा

खानापूर आगाराचे डेपो व्यवस्थापक संतोष बेनकनकोप यांनी शक्ती योजनेची माहिती दिली. सप्टेंबर महिन्यात शक्ती योजनेअंतर्गत महिलांनी तब्बल 6,72,495 प्रवास केले असून, या मोफत प्रवासाची एकूण रक्कम ₹1,90,19,188 इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी गुंजी येथील माऊली देवी जत्रा तसेच कक्केरी जत्रेसाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जास्तीत जास्त बसफेऱ्या सोडण्याची सूचना करण्यात आली.

तसेच नांदगड येथे एक्सप्रेस बस जात नसल्याची तक्रार करण्यात आली. माळ अंकले येथे सायंकाळच्या वेळेत बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. हेमडगा–डोंगरगाव–अनमोड मार्गावरील बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सायंकाळी ५ वाजता अतिरिक्त बस सोडावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

संगरगाळी गावासाठी सकाळी व सायंकाळी बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. बससेवेअभावी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याने या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, असा ठराव बैठकीत मांडण्यात आला.

गृहज्योती योजनेचा आढावा

हेस्कॉम सहाय्यक अभियंता लक्ष्मण रंगनाथ यांनी गृहज्योती योजनेची माहिती दिली. तालुक्यात 63,743 लाभार्थी असून सप्टेंबर महिन्यात लाभार्थ्यांना ₹2,12,37,000 इतक्या रकमेची वीज बिलात सवलत/माफी मिळाल्याची माहिती देण्यात आली.

गृहज्योती योजनेच्या पुनर्पडताळणीचे 1,115 प्रकरणे अद्याप बाकी असून, संबंधित लाभार्थ्यांनी या महिन्याच्या अखेरपर्यंत पुनर्पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी सदस्यांनी कुठीनोनगर येथे गेल्या तीन वर्षांपासून वीजेचा खांब पडलेल्या अवस्थेत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून हा खांब तातडीने बसवावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच एका हेस्कॉम विभागीय अधिकाऱ्याकडे किती ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे, याची माहिती पुढील बैठकीत लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मागील बैठकीत विभागीय अधिकारी चकलीमठ यांच्याबाबत कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्या संदर्भात काय कारवाई करण्यात आली, याची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

जंगल परिसरातील वीज खांबे बदलण्याबाबत यापूर्वी मागविलेली माहिती अद्याप देण्यात आलेली नसल्याने ती माहिती समितीला तातडीने उपलब्ध करून द्यावी, असा ठरावही करण्यात आला.

अन्नभाग्य योजनेवर सदस्यांचे प्रश्न

अन्नभाग्य योजनेची माहिती उप तहसीलदार (आहार विभाग) शरणाप्पा बागेवाडी यांनी दिली. तालुक्यात 6,471 अंत्योदय कार्ड, 56,151 बीपीएल कार्ड आणि 2,085 एपीएल कार्ड असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी सदस्य प्रकाश मादार यांनी मागील बैठकीला अधिकारी का उपस्थित नव्हते, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच गॅरंटी योजना समितीचे सदस्य ज्या रेशन दुकानांची पाहणी करतात, त्या ठिकाणी समितीच्या सदस्यांना का बोलावले जात नाही, असा सवालही करण्यात आला.

समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक माहिती न दिल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव मांडण्यात आला.

रेशन कार्डच्या ई-केवायसीची अंतिम तारीख 20 सप्टेंबर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, याबाबत शासनाचा लेखी आदेश आहे का, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. आदेश दाखविण्याची मागणी केली असता संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी शासन आदेश उपलब्ध नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.

यावेळी विवेक तडकोड यांनी हिरेहट्टीहोळी गावातील रेशन दुकानात लाभार्थ्यांना तीन किलो तांदूळ कमी दिला जात असल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली होती. त्यावर अद्याप कोणती कारवाई करण्यात आली, तसेच संबंधित दुकानाची तपासणी केली का, असा सवाल त्यांनी केला. तक्रारदाराला तपासणीच्या वेळी का बोलावण्यात आले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावर संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला.

गृहलक्ष्मी योजनेचा आढावा

एसीडीपीओ शारदा मराठे यांनी गृहलक्ष्मी योजनेची माहिती दिली. तालुक्यात 67,432 महिला लाभार्थी असून त्यांच्या खात्यावर दर महिन्याला सुमारे ₹13,48,64,000 जमा होत असल्याची माहिती देण्यात आली.

आत्तापर्यंत जून महिन्यापर्यंतचे पैसे जमा झाले असून, तीन महिन्यांची रक्कम अद्याप जमा होणे बाकी आहे. ही रक्कम चालू महिन्यात जमा होईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी सदस्यांनी गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांना स्वतःच्या नावावर सिमकार्ड असणे आवश्यक आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सिमकार्ड दुसऱ्याच्या नावावरून पोर्ट केले तरी चालते, अशी माहिती देण्यात आली.

मात्र, याबाबत शासनाचा लेखी आदेश आहे का, असा प्रश्न सदस्यांनी केला असता, अधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये तोंडी सूचना देण्यात आल्याचे सांगितले; मात्र याबाबत अद्याप कोणताही लेखी शासन आदेश प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट झाले.

युवा निधी योजनेबाबत अधिकारी अनुपस्थित

युवा निधी योजनेचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाचा कोणताही अधिकारी बैठकीस उपस्थित नव्हता. मात्र विभागाकडून प्राप्त अहवालानुसार तालुक्यात सुमारे 4,300 युवक युवा निधीचा लाभ घेत असल्याची माहिती देण्यात आली.

बैठकीदरम्यान विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात आणि लाभार्थ्यांना योजनांचा योग्य लाभ मिळावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, अशी सूचना समितीच्या अध्यक्षांनी केली.

या बैठकीस प्रकाश मादार, रुद्राप्पा पाटील, जगदीश पाटील, प्रियांका गावकर, शांताराम गुरव, गोविंद पाटील, युसुफ हारगी, बाबू अत्तरवाड, विवेक तडकोड, संजय गावडे यांच्यासह गॅरंटी योजना समितीचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी आणि तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी रमेश मैत्री उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर समिती लढवणार जि. पं. व ता. पं. निवडणुका

Spread the love  जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार १ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन खानापूर : जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *