


खानापूर : येथील मराठा मंडळ शिक्षण संस्था संचलित ‘ताराराणी पी. यु. कॉलेज’मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून रोजी ‘सेल्फी विथ अ प्लांट’ (Selfie with a Plant) या अनोख्या उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला होता. तरुण पिढीमध्ये निसर्गाबद्दल आपुलकी, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश असून.
या उपक्रमाला मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा, पर्यावरणप्रेमी डॉ. राजश्री नागराजू [हलगेकर] यांच्या प्रेरणादायी विचारांची आणि पर्यावरण प्रेमाची मोठी जोड लाभली आहे. त्यांचे निसर्गावरील अथांग प्रेम आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व रुजवण्याचा दृष्टिकोन या कॉलेजच्या प्रत्येक उपक्रमात प्रकर्षाने दिसून येतो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा पर्यावरणपूरक उपक्रम महाविद्यालयीन पातळीवर मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुमारे दोनशे रोपट्यांची लागवड केली होती. हे संपूर्ण अभियान आणि रोपट्यांची जोपासना प्राचार्य श्री. अरविंद पाटील यांच्या सक्षम निरीक्षणाखाली व मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. विशेष कौतुकाची बाब म्हणजे, सध्याच्या दुष्काळी वातावरणातही विद्यार्थिनींनी अत्यंत जिद्दीने व काळजीपूर्वक या रोपट्यांची छान निगा राखल्याचे निरीक्षणादरम्यान स्पष्टपणे निदर्शनास आले.
विद्यार्थ्यांनी लागवड केलेल्या जवळजवळ दोनशे रोपट्यांची वाढ त्यांची निगा आणि घेतलेली काळजी यांचे बारकाईने निरीक्षण करून स्पर्धेचे क्रमांक काढण्यात आले. या विशेष स्पर्धात्मक मूल्यमापनामध्ये II Commerce ची कु.वेलंका मस्करीन हिने प्रथम क्रमांक, I Commerce ची कु. राधिका हंडी हिने द्वितीय क्रमांक आणि II Commerce ची कु.कीर्ती कुट्रे हिने तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध रोपट्यांसोबत कल्पक सेल्फी काढून डिजिटल माध्यमांद्वारे वृक्षारोपण व हरित परिसर जपण्याचा सकारात्मक संदेश दिला. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कॉलेजमधील प्राध्यापक एन. ए. पाटील, टी. आर. जाधव, पी. व्ही. कर्लेकर, आर. व्ही. मरितमनवर, मंगल देसाई, सुनिता कणबरकर, जयश्री शिवटणकर, वनिता गावडे आणि नितीन देसाई तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. या छोट्याशा उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती संवेदनशीलता आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्याची नवी ऊर्जा निर्माण केली असून संचालक श्री. शिवाजी पाटील, श्री. परशराम गुरव व प्राध्यापक वर्गाने सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta