कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला. पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेने वाहत आहे. गेल्या २४ तासात पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांच्या संख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. सायंकाळी चार वाजता ७२ बंधारे पाण्याखाली गेले होते. जिल्ह्यात आज सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात संततधार कायम आहे. शहरातही पावसाने जोर धरला होता. राधानगरी धरणात साडेपाच टीएमसी पाणीसाठा असून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३३ मिमी पाऊस झाला आहे. गगनबावडा येथे सर्वाधिक १०० मिमी पाऊस झाला. शिवाय, पन्हाळा- ३० मिमी, शाहुवाडी- ५३ मिमी, राधानगरी- ४५ मिमी, गडहिंग्लज- ३५ मिमी, भुदरगड- ६२मिमी, आजरा- ५३ मिमी, चंदगड- ५४ येथेही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
दरड कोसळली
आजरा ते चंदगड रस्त्यावर कासारकांडगाव -जेऊर या गावाच्या मध्ये दरड कोसळली. रस्त्याला लागून असलेल्या डोंगरावरून काही दगड घसरून खाली आले आहेत. स्थानिक प्रशासन व वन विभागामार्फत दगड व झाडे बाजूला करून रस्ता खुला केला आहे.