Saturday , June 14 2025
Breaking News

मंदिराच्या संवर्धनासह भाविकांच्या सोयीची कामे प्राधान्याने करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Spread the love

 

जिल्हाधिकारी कार्यालयात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कामकाजबाबतचा आढावा

कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई व श्री क्षेत्र केदारेश्वर जोतिबा या दोन्ही मंदिरांच्या विकास आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. राज्यसह संपूर्ण देशातील भाविकांचा आणि कोल्हापूर वासियांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनातील सर्व यंत्रणेचे तसेच लोकप्रतिनिधींचे याबाबत त्यांनी अभिनंदन व्यक्त करून मंदिराच्या संवर्धनासह भाविकांच्या सोयीची कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृह येथे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी तथा पश्चिम देवस्थान समितीचे प्रशासक अमोल येडगे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंदिर परिसरातील विविध भाविकांच्या सोयींमध्ये वाढ व्हावी, आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तातडीने करावी, एक कालबद्ध कार्यक्रम आखून कामाला सुरुवात व्हावी या पद्धतीच्या सूचना पालकमंत्री आबिटकर यांनी या बैठकीत उपस्थित त्यांना दिल्या. ते म्हणाले मंदिर व मंदिर परिसरातील विविध विकास कामांचा समावेश या आराखड्यात करण्यात आल्या आहे. मात्र याचबरोबर येत्या काळात पुढील नियोजन करीत असताना शहरांमध्ये मंदिरापर्यंत येण्या जाण्याचे मार्ग किंवा तेथील परिसरही चांगल्या पद्धतीने करा जेणेकरून मंदिरापर्यंत बाहेरून येणाऱ्या पर्यटक भाविकांना सहज पोहोचता येईल. आता राज्यमंत्री मंडळाने या दोन्ही विकास कामांना मंजूर दिल्याने एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे याबाबत लवकरच शासन निर्णय ही येईल. काम करणाऱ्या यंत्रणांना एक कालबद्ध कार्यक्रम आखून देऊन कामे वेळेत आणि अखंडित सुरू होतील यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी समितीला दिल्या.

पहिल्या टप्प्यात अशी होणार कामे

श्री अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखडा – टप्पा एक मध्ये श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत भूसंपादनाचे विवरण 257.94 कोटींचे असून बांधकामासाठीचा खर्च 163.39 कोटी असा एकूण खर्च 421.33 कोटी करण्यात येणार आहे. यात भूमिगत मजल्याचा प्रस्तावित आराखडा, लोअर लेव्हल प्लाझा एक यामध्ये स्त्रियांसाठी दहा पुरुषांसाठी दहा टॉयलेट ब्लॉक, लॉकर रूम, चप्पल स्टैंड व पिण्याचे पाण्याची सोय, दुकाने 28, अच्छादित दर्शन मंडप यात 1000 भक्तांसाठी बैठक व्यवस्था असलेला हॉल, टॉयलेट्स तसेच 4000 भक्तांसाठी दर्शन रांग प्रत्येकी 1000 क्षमतेचे एकूण चार हॉल अशी एकूण 5000 ची संख्या, अंफीथिएटर स्टेज व त्या समोरील प्लाझा व लँडस्केपिंग, माहिती केंद्र, सुरक्षा विभाग ऑफिस आणि ऐतिहासिक मंदिराचा जीर्णोद्धार, भूस्तरीय मजल्याच्या प्रस्तावित आराखड्यात अप्पर लेवल प्लाझा एक यामध्ये पार्किंग 50 चार चाकी व केएमटी बस थांबा, लोअर प्लाझा व पार्किंग साठी विविध ठिकाणी प्रवेश मार्ग, ड्रॉप ऑफ पॉईंट, भूमिगत मंदिरासाठी प्रवेश मार्ग इत्यादी कामांचा समावेश आहे.

श्री जोतिबा मंदिर व परिसर संवर्धन – पहिल्या टप्प्यामध्ये प्रस्तावित कामे व अंदाजपत्रक रक्कम पुढीलप्रमाणे यामध्ये श्री जोतिबा मंदिर संवर्धन व दुरुस्ती करणे यासाठी 55 कोटी, यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्ती करणे 25 कोटी, जुन्या ऐतिहासिक पायवाटा संवर्धन व सुशोभीकरण 21.18 कोटी, श्री जोतिबा डोंगरकड्यांचे संवर्धन करणे यामध्ये वृक्षारोपण 56 लक्ष, ज्योतस्तंभ उभारणे 15.30 कोटी, नऊ तळे परिसर 25.50 कोटी, केदार विजय गार्डन 20.40 कोटी, श्री यमाई मंदिर चाफेवरन परिसर विकास 10.20 कोटी, करपुर तलाव संवर्धन व सुशोभीकरण 7.65 कोटी, चव्हाण तलाव संवर्धन व सुशोभीकरण 20.40 कोटी, मुरलीधर पुष्करणी तलाव संवर्धन व सुशोभीकरण 10.20 कोटी, भाविकांचा साठी वाहनतळ सुविधा केंद्र उभारणी करणे 24.37 कोटी आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन 27.03 कोटी अशा रीतीने एकूण 262.79 कोटींची कामे केली जाणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

“गोकुळ”च्या चेअरमनपदी मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची निवड

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापूर येथील गोकुळ दूधसंघाच्या चेअरमनपदी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *