कोल्हापूर : कोल्हापूर येथील गोकुळ दूधसंघाच्या चेअरमनपदी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची निवड झाली आहे. अध्यक्षांची निवड करण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून कोल्हापुरात राजकीय खलबतं चालू होती. नाविद यांच्या निवडीसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी व महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यास यश मिळालं आहे. आज कोल्हापुरात गोकुळच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नाविद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
महायुतीचाच माणूस गोकुळचा अध्यक्ष व्हायला हवा अशा सूचना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांना दिला होता. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते तथा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. नाविद हे गोकुळ मिल्क युनियनचे संचालक देखील आहेत.
गोकुळमध्ये (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) गेल्या अनेक वर्षांपासून आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांचा दबदबा आहे. गोकुळचा कारभार या दोन नेत्यांच्या हाती असतो. मुश्रीफ समर्थक अरुण डोंगळे हे गोकुळचे अध्यक्ष होते. मात्र, त्यांची अध्यक्षपदाची दोन वर्षाची मुदत संपल्याने ते १५ मे रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा देणार होते. मात्र, त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. मात्र, मुदत संपल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, संचालक मंडळाची आज बैठक पार पडली आणि या बैठकीत नव्या अध्यक्षांची निवड झाली आहे.