चंदगड : दड्डी- राजगोळी रस्त्याचे काम चालू आहे. मात्र या कामाचा फटका येथील विष्णू पाटील नामक गरीब शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे. दड्डी- राजगोळी रस्त्याचे काम सांगलीच्या शिवपार्वती कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. पावसाळ्याची अगोदर काम पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न सुरू आहे. या घाईगडबडीत उखडून काढलेल्या रस्त्यावरील टाकाऊ कचरा, माती, दगड विष्णू पाटील या शेतकऱ्याच्या शेतात टाकण्यात येत आहे. विष्णू पाटील यांनी सदर ठेकेदाराला सूचना करून देखील हा ठेकेदार रस्त्याची माती सुपीक शेतात जाणूनबुजून टाकत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला शेती मशागतीचे काम करण्यासाठी अडचणी येत आहेत तरी संबंधित खात्याने सुपीक जमिनीत टाकण्यात आलेली टाकाऊ माती, दगड इतरत्र हलवावे व त्या ठेकेदारास वेळीच समज देण्यात यावी, अशी मागणी शेती मालक विष्णू पाटील यांनी केली आहे.
