मुंबई : पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडलील आहे. ज्यामुळे रेल्वे रुळावर रक्त आणि मृतदेह पसरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळी ८:२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून निघालेल्या या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. मुंबई-लखनौ दरम्यान धावणारी ही ट्रेन गर्दीच्या वेळी प्रवाशांनी खचाखच भरली होती. त्याचवेळी ही घटना घडली. घटनास्थळी रक्त आणि मृतदेह पाहून भीतीचं वातावरण निर्माण झाले. रेल्वेकडून मदतकार्य आणि चौकशी सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेसमधून १० ते १२ प्रवासी दरवाज्याला लटकून प्रवास करत होते. सकाळच्या वेळी शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने प्रवाशांची संख्या जास्त होती. दरवाज्यावर लटकलेल्या प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे. यात ६ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला म्हणाले, “मुंब्रा-दिवा दरम्यान ५ प्रवासी पडल्याची माहिती आहे. ट्रेन आणि घटनेच्या कारणांची चौकशी सुरू आहे.” रेल्वे प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, या घटनेची सखोल तपासणी सुरू आहे. ही घटना रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी ठरली आहे.