Thursday , August 20 2026
Breaking News

पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; महाराष्ट्राला अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता

Spread the love

 

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल किंवा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी झालेल्या भेटीनंतर या चर्चांना अधिक वेग आला आहे. पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर आणि जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले ५ राज्यमंत्री आणि ३५ राज्यमंत्री आहेत. आगामी विस्तारात काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून, विनोद तावडे, तरुण चुग आणि के. लक्ष्मण यांची नावे चर्चेत आहेत. तसेच महिलांना अधिक प्रतिनिधित्व देण्याचाही विचार सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते. जेडीयूकडून काही नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या राज्यांतील प्रतिनिधित्व वाढवण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनाही सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.

मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, सर्व चर्चा या राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार सुरू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

टँकरची ऑटो रिक्षाला धडक; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love  शेतीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; ७ हून अधिक जण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *