

खानापूर : गोवा राज्यातील सत्तरी तालुक्यातील ठाणे ग्रामपंचायत हद्दीतील सुरल (सुर्ल) येथील, खानापूर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या धबधब्यात बेळगावातील २० वर्षीय तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. २८) घडली. बुडालेल्या तरुणाचे नाव आदित्य दीपककुमार सत्पती (वय २०) असे असून तो मित्रांसह पिकनिकसाठी गेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, धबधब्यात उतरल्यावर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आदित्य खोल पाण्यात गेला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलीस, म्हादई अभयारण्याचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
रविवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाल्याने रात्री मोहीम स्थगित करण्यात आली. सोमवारी (ता. २९) सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले.
दरम्यान, पावसाळ्यात म्हादई अभयारण्य परिसरातील धबधब्यांवर बेळगाव व खानापूर परिसरातील पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वन विभागाने धोकादायक ठिकाणी जाण्यास वारंवार मनाई करूनही अनेक पर्यटक सूचना धाब्यावर बसवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
आदित्य हा मूळचा ओडिशा राज्यातील असून त्याचे कुटुंब सध्या बेळगावात वास्तव्यास आहे. त्याचे वडील दीपककुमार सत्पती हे भारतीय नौदलातून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta