लोकसभेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील दोन उर्वरित जागांसाठीचे उमेदवार घोषित केले असून, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. केंद्रात मंत्रीपदावर राहण्यासाठी नक्वी यांना राज्यसभा किंवा लोकसभा सदस्य असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रामपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांना संधी दिली जाणे निश्चित मानले जात आहे.
भाजपने गेल्या रविवारी उत्तर प्रदेशातून सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर उर्वरित दोन जागांवर नक्वी यांना संधी मिळेल, असे मानले जात होते. तथापि पक्षाने त्यांना राज्यसभेवर संधी दिलेली नाही. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा रामपूर हा बालेकिल्ला मानला जातो. रामपूर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. त्यामुळे येथून नक्वी यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता आहे.
राज्यसभेसाठी भाजपने जे दोन उमेदवार घोषित केले आहेत, त्यात मिथिलेश कुमार आणि के. लक्ष्मण यांचा समावेश आहे. शाहजहांपूरचे रहिवासी असलेले मिथिलेश कुमार दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मिथिलेश कुमार हे सपाचे माजी खासदार आहेत. भाजपच्या आधी जाहीर केलेल्या यादीत एकही दलित समाजातला नव्हता. त्यामुळे त्यांना संधी देऊन जातीय समीकरण पक्षाने साधले आहे. भाजपचे दुसरे उमेदवार के. लक्ष्मण हे तेलंगणचे आहेत. तेलंगण प्रदेश भाजप अध्यक्ष म्हणून काम केलेले लक्ष्मण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.