Sunday , September 8 2024
Breaking News

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत ३१ मार्च रोजी महारॅलीचंं आयोजन!

Spread the love

 

नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. कोर्टाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या निषेधार्थ इंडिया आघाडीने एकजूट दाखवली असून देशभर निदर्शने केली जात आहेत. तसंच, आता ३१ मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर आता महारॅलीही काढण्यात येणार आहे. इंडिया आघाडीने आज रविवारी याबाबत जाहीर घोषणा केली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने २१ मार्च रोजी दिल्लीतील सिव्हिल लाइन्स भागातील त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर झडती घेतल्यानंतर मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत अटक केली होती. त्यानंतर कथित दारू घोटाळ्यातील अनियमिततेतील त्यांच्या भूमिकेबद्दल तपशीलवार आणि सतत चौकशी करण्यासाठी त्यांना २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले.

मोदींकडून यंत्रणांचा गैरवापर
आज पत्रकार परिषदेला संबोधित करताना, इंडिया आघाडीतील आप आणि काँग्रेसने रॅलीची घोषणा केली. “लोकशाही आणि देश धोक्यात आहे. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष देशाचे हित आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी ही ‘महारॅली’ काढतील”, असे आप नेते गोपाल राय म्हणाले. “हुकूमशाहीचा अवलंब करून देशातील लोकशाही संपवून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. संविधान आणि लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या आणि आदर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये संताप आहे. प्रत्येक विरोधी नेत्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पंतप्रधान मोदी यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत”, आप नेते पुढे म्हणाले.

काँग्रेसचे दिल्लीचे प्रमुख अरविंदर सिंग लवली यांनीही सांगितले की, “३१ मार्चची ‘महारॅली’ ‘राजकीय’ नसून देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आणि केंद्राविरोधात आवाज उठवण्याची हाक असेल.” शुक्रवारी, इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबद्दल आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी नेत्यांना कथित लक्ष्य केल्याच्या विरोधात आपला निषेध नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाची भेट घेतली.

“३१ मार्चला रामलीला मैदानात सकाळी १० वाजता इंडिया आघाडीकडून महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या देशातील लोकशाही वाचवण्याकरता या रॅलीचं नियोजन करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने लोकशाहीवर हल्ला झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक केली जाते. काँग्रेसची खाती निष्क्रिय केली जातात. आता प्रश्न निर्माण होतोय की रॅलीला परवानगी मिळेल की नाही. विरोधकांना निवडणुकाच लढवू दिले जात नाहीय, त्यामुळे देशात लोकशाही कशी वाचेल?” असा प्रश्न आपच्या नेत्या आतिशी यांनी विचारला.

About Belgaum Varta

Check Also

सिक्कीममध्ये सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळून ४ जवानांचा जागीच मृत्यू

Spread the love  नवी दिल्ली : सिक्कीमध्ये गुरुवारी भारतीय सैन्य दलाचे वाहन ७०० ते ८०० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *