हुक्केरी : धर्मादाय विभागाच्या अखत्यारीत येणार्या मंदिराच्या पुजार्यांना तसेच कर्मचार्यांना आरोग्य विमा सुरक्षा आणि सहावा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात धर्मादाय तसेच हज आणि वक्फ विभाग मंत्री शशिकला जोल्ले यांनी नुकतीच घोषणा केली होती. या घोषणेसंदर्भात अधिकृत माहिती आज हुक्केरी हिरेमठाच्या दसरोत्सवात त्यांनी दिली आहे.
हुक्केरी हिरेमठाच्या दसरा उत्सवांतर्गत रंगायन नाटकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेळगाव कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात चंद्रशेखर महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली हज आणि वक्फ विभाग मंत्री शशिकला जोल्ले यांनी नाटकोत्सवाला वाद्य वाजवून चालना दिली. यावेळी व्यासपीठावर चिकोडी खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी मंत्री शशिकांत नाईक, काडा अध्यक्ष विश्वनाथ पाटील, नगरपालिका अध्यक्ष ए. के. पाटील, धारवाड नाट्यसंचालक रमेश परविनायक, मुक्तार पठाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकला जोल्ले म्हणाल्या, धर्मादाय विभागाच्या अखत्यारीत कार्य करणार्या पुजार्यांना विमा योजना आणि सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच धर्मादाय विभागाच्या व्याप्तीत येणार्या देवस्थानच्या पुजारी आणि कर्मचार्यांच्या आरोग्याची जबाबदारी मी घेतली आहे. यानुसार धर्मादाय विभागातील सुमारे 37000 कर्मचार्यांना याचा लाभ घेता येणार आहे. धर्मादाय विभागात काम करणार्या कर्मचार्यांना सध्या पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येत असून सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील करण्यात आली आहे. त्या पुढे म्हणाल्या अनेक वर्षांपासून पुजारी आणि कर्मचार्यांनी सहावा वेतन आयोग लागू करावा आणि आरोग्य सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला असून देवस्थानांच्या वार्षिक उत्पन्नाच्या 35 टक्के म्हणजेच एकूण 20 कोटी खर्चातून वेतन कर्मचार्यांना देण्यात येणार आहे. यामुळे सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. सी दर्जाच्या देवस्थानांच्या पुजार्यांना सहावा वेतन आयोग लागू होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री जोल्ले म्हणाल्या की, सदर देवस्थानमध्ये कायम पुजारी उपलब्ध नसतात. त्यामुळे यासंदर्भात देवस्थानांशी संपर्क साधून माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. सर्व मंदिरांची सुमारे 19 कोटी रुपयांची थकबाकी लवकरच जाहीर करण्यात येईल. शिवाय इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट मॅनेजमेंट सिस्टम लागू करून देवस्थानांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. देशातील कर्नाटकात राज्यात सुरु करण्यात येत असलेला हा पहिलाच प्रकल्प ठरेल, असे शशिकला जोल्ले म्हणाल्या. सध्या कोरोनाच्या तिसर्या लाटेची चर्चा सुरु असून या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पहिल्या आणि दुसर्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातील सर्व मंदिरांमध्ये दसर्याच्या निमित्ताने सर्वांच्या आरोग्य रक्षणासाठी विशेष पूजा – अर्चा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही शशिकला जोल्ले म्हणाल्या.
Check Also
यंदाच्या हंगामात ऊसाला प्रतिटन ६ हजार मिळालेच पाहिजेत
Spread the love राजू पोवार ; विधानसभेवरील मोर्चाबाबत निपाणीत बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …