Share
मानवाधिकार संघटनेकडून पालिकेला निवेदन
निपाणी(वार्ता) : शहरातील सर्वच रस्त्यावर गेल्या काही महिन्यापासून अनेक जनावर मालकांकडून जनावरे मोकाट सोडली जात आहेत. त्यामुळे शहरवासीयांना त्रास होत आहे. या जनावरांनी अनेक नागरिकांना जखमी करण्याबरोबरच वाहनांचे नुकसानही केले आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन मानवाधिकार संघटनेतर्फे नगरपालिकेला देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, शहरातील बस स्थानक, मुरगुड रोड, चिकोडी रोड, नरवीर तानाजी चौक, अशोक नगर, बेळगाव नाका, भाजी मार्केट परिसरात मोकाट जनावरांचा कळप दिवसभर फिरत असतो. त्यामुळे रस्त्यावरून वाहनधारकासह विद्यार्थी व नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. शिवाय जनावरांच्या टकरी आणि धडके मुळे नागरिक जखमी होत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच पालिका प्रशासनाने तात्काळ मोकाट जनावरांच्या मालकांना ताकीद देण्यासह ही जनावरे शहराबाहेर नेऊन सोडण्यात यावीत.
नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बाबर, उपाध्यक्ष योगिता कांबळे, निखिल वाईंगडे, दयानंद पाटील, वैशाली खोत, माजी नगरसेवक नंदकुमार कांबळे, सतीश खोत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Post Views:
330