तवंदी घाटातील घटना : नवीन वर्ष साजरे करून येताना दुर्घटना
निपाणी (वार्ता) : गोवा येथे नवीन वर्ष साजरे करून गावाकडे परतणाऱ्या स्कार्पिओचा पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी जवळील तवंदी घाटात झालेल्या अपघातात वयोवृद्ध पती-पत्नी जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर २ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. मंगळवारी (ता.३) चार वाजण्याच्या सुमारास अमर हॉटेल समोर हा अपघात घडला. शिवदास धर्माजी बोरकर (वय ६५), सुरेखा शिवदास बोरकर (वय ६९ दोघेही रा. केसरवाडा लाखनी जिल्हा भंडारा अशी मृतांची नावे आहेत. तर प्रियांका सुहास ढोके (वय ३१), चालक नितेश रामदास ढोके (वय ३५ रा. केसरवाडा ता. पवनी, जि. भंडारा), प्रसाद निजगौडा किल्लेदार (वय १७ रा.चिंचणी ता. चिकोडी अशी जखमींची नावे आहेत.
अपघाताबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, भंडारा जिल्ह्यातील नातेवाईक थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी स्कार्पिओ वाहनातून गेले होते. तेथे दोन दिवस थांबून पुन्हा ते भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावाकडे परतत होते. मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तवंदी घाट पार करून स्कार्पिओ निपाणी मार्गे गावाकडे भरधाव निघाले होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावरून तवंदी घाटात हॉटेल अमर नजीक स्कार्पिओ आल्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटटले. त्यामुळे स्कार्पिओ दुभाजकाला धडकून पलीकडच्या बाजूला स्तवनिधी बस स्थानक शेजारी जाऊन पलटी झाली. त्यावेळी बस स्थानकावर थांबलेला महाविद्यालयीन विद्यार्थी प्रसाद निजगौडा किल्लेदार याला स्कार्पिओनी धडक दिली. या अपघातात हा विद्यार्थी जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर प्रियांका सुहास ढोके व चालक नितेश ढोके हे जखमी झाले. तसेच या अपघातात एक पाच वर्षाची चिमुकली सुदैवाने बचावली आहे. जखमींना येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीसात झाली आहे. मंडल पोलीस शिक्षक संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसुर, हवालदार बसू लोकरे, प्रवीण किलिकेतर, मंजू कल्याणी, श्रीशैल संती यांच्यासह सहकाऱ्यांनी पंचनामा केला. रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत सुहास ढोके यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.