लाखो भक्तांनी घेतले शेवटचे दर्शन, अंतिम यात्रेस जनसागर
विजयपूर : भूमीवरील चालता बोलता देव, विजयपूरातील ज्ञानयोगा आश्रमाचे पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजींची काल अल्पशा आजाराने प्राणज्योत मालवली.
ज्ञानयोगा आश्रमात श्रींचे पार्थिव काल रात्री पासून आज पहाटे चार वाजेपर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता, त्यानंतर शहरातील अथणी रोड वरील सैनिक स्कूलच्या मैदानावरील विशाल व्यासपीठावर श्रींचे पार्थिव सार्वजनिकांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात आला. शासकीय सन्मानाने श्रींच्या समोर राष्ट्रध्वज लावून जिल्हा अधिकारी डॉ. विजयमहांतेश दानम्मन्नवर व जिल्हा पोलिस प्रमुख एच. डी. आनंदकुमार यांच्या वतीने शासनातर्फे आदरांजली वाहण्यात आली.
जनतेला रांगेत दर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व व्यवस्था करण्यात आली होती. लाखो भक्तांनी साश्रुनयनांनी शेवटचं दर्शन घेतले. कर्नाटक, महाराष्ट्रसह अनेक इतर राज्यातील विविध मठाचे हजारो मठाधिपती, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री बी. एस. यडीयुरप्पा यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे खासदार, आमदार हजारो नेते, कार्यकर्त्यांनी श्रीगुरुंचे अंतिम दर्शन घेतले.
दुपारी ठिक पाच वाजता सैनिक स्कूलपासून फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांचा अंतिम यात्रेस सुरुवात झाली. शहरातील छत्रपती संभाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, श्री सिद्धेश्वर रोड, बीएलडिई रोड प्रमुख मार्गावरून ज्ञानयोग आश्रम पोहोचला. अंतिम यात्रेस जनसागर लोटला होता, तर दुतर्फा रोडवर असंख्य लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
विरशैव लिंगायत संप्रदाय असूनही आश्रमाच्या आवारात पोहचल्यावर कुठलाही धार्मिक विधीविधान करू नये समाधी करु नये भस्म व अस्थी सुमद्रात किंवा नदीत विसर्जन करण्यात यावी अशी स्वामीजींची इच्छा होती. त्यानुसार सरळ साधा पद्धतीने, प्रार्थना करीत श्रीगंद, चंदना लाकडांची रचलेल्या चितेवर अग्नी स्पर्श करून ठिक 8-50 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
आश्रम रोडवर अत्यंयात्रा येत असताना संपूर्ण रस्त्यावर आकर्षक रांगोळी घालण्यात आली होती तर महिला आरती करीत होत्या. देवाच्या घरी देव जात असल्याची भावना अनेक भक्तांनी व्यक्त केले.
आमदार बसवनगौडा पाटील यतनाळ यांच्या सिद्धेश्वर संस्था, व माजी मंत्री एम. बी. पाटील यांच्या बीएलडीई संस्थेच्या वतीने शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांवर जवळपास वीस ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
ओम् नमः शिवाया, ओम् नमः शिवाया, श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या जयजयकार करीत लाखो भाविक येत होते.
श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या शिस्तीचा शिकविण्यानुसार अत्यंत शिस्तबद्ध रीतीने भक्तगण स्वामीजींचे दर्शन घेतले.
सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी, स्वयंसेवक गर्दी नियंत्रणासाठी
शिस्तीचा कार्यात, संचार व्यवस्थेसाठी सहकार्य करीत होते.
विजयपूरातील सर्व बाजार पेठ, दुकाने बंद ठेवून चौकाचौकात श्रींचे भावचित्र लावून स्वामीजींना आदरांजली वाहण्यात आली तर अनेक ठिकाणी अन्नप्रसाद, अल्पोपहार, चहा पाण्याची सोय करण्यात आली होती.