सौंदलगा : सौंदलगा येथील वेदगंगा नदीकाठी असणाऱ्या म्हसोबा मंदिर जवळील यमगरणी व नांगनूर मधून येणाऱ्या ओढ्याजवळ दोन मगरी आढळून आल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
सौंदलगा येथील वेदगंगा नदीकाठी येथील शेतकरी मुरली पाटील, जगदीश यादव, नंदू काळुगडे, निवृत्ती काळुगडे हे आपल्या कुटुंबासहित गवत कापण्यासाठी गेले असता त्यांना नांगनूर व यमगरणी या गावच्या मधून आलेल्या ओढ्यासमोर नदीमध्ये दोन मगरी आढळून आल्या. त्यामध्ये एक मगर जवळजवळ आठ ते नऊ फुटाची आहे तर दुसरी मगर पाच फुटाची आहे. त्या मगरी जवळजवळ आठ दिवस झाले त्यांचे एकाच ठिकाणी वास्तव्य असून शेतीच्या पाण्याच्या मोटारी बंद झाल्यानंतर ह्या मगरी उन्हासाठी म्हणून या ठिकाणी येऊन थांबत आहेत. दोन दिवसांपूर्वी कुन्नूर येथील काही लोक मासे पकडण्यासाठी या ठिकाणी आले होते. पण मगरीला पाहताच ते परत निघून गेले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी या मगरी पासून धोका पोहोचू शकतो. तरी या संबंधित वन खात्यातील अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन सदर दोन मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व गावकरी मंडळी करत आहेत.