निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष, साखर व्यवसायातील उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांची बेळगाव येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटवर खासगी तत्त्वावरील विभागात सदस्य पदी बिनविरोध निवड झाली आहे.
सन २०२४-२५ ते २०२८-२९ या सालासाठी ही निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी एम. एन. मणी यांनी सांगितले. चिक्कोडी तालुक्यातील जैनापुर येथील अरिहंत शुगर्स या साखर कारखान्याच्या माध्यमातून अभिनंदन पाटील त्यांनी साखर उद्योगात पदार्पण केले. कारखान्यासाठी त्यांनी काटकसरीने नियोजन करून सर्व हंगाम यशस्वी केले. हंगामात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून ऊसाला योग्य दर दिला आहे. याशिवाय निर्धारित वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिले जमा करून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे.
रामदुर्ग तालुक्यातील उदपूडी येथील शिवसागर शुगर कारखाना घेऊन व घटप्रभा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला मिळणारा भाव व आपण शेतकऱ्यांच्या उसाला देत असलेल्या भाव यात ताळमेळ नसतानाही त्यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय साखर धोरण, इथेनॉल निर्मितीवर येणाऱ्या अडचणी, साखर महामंडळाच्या नियम, या सर्व गोष्टींवर मात करत साखर व्यवसायात भरीव कामगिरी केली आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत बेळगाव एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या निवडणुकीत अभिनंदन पाटील यांची सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली.