दुचाकीस्वारांच्या घिरट्या : महिलांच्यात घबराहाट
कोगनोळी : मागील काही दिवसांपासून कोगनोळी परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळ्या चोऱ्यांचे प्रकार भामट्या दुचाकीस्वारांकडून पुन्हा सुरू झाले आहेत.
रविवारी दुपारी चारच्या सुमारास दत्तवाडीतील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी हिसकावून पळ काढला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तवाडी तालुका निपाणी येथील इंदूबाई नामदेव डूम (वय 62) या येथील पिण्याच्या पाण्याच्या टॉकीजवळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात मोटरसायकल वरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येऊन गाडी हळू करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून तोडून घेऊन पळ काढला. अचानक त्यांच्यावर हल्ला झाल्याने घाबरल्या. काय समजायच्या आत गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने घेऊन पळ काढला. गळ्यातील मंगळसूत्र हसडा मारून चोरी केल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. आजूबाजूचे लोक जमा होऊ पर्यंत अज्ञात चोरट्याने मोटरसायकल वरून पळ काढून गायब झाले.
हंचिनाळ येथील महिलेचे मंगळसूत्र चोरीची घटना ताजी असतानाच दत्तवाडी येथे घडलेल्या घटनेमुळे महिला वर्गात मोठी घबराट निर्माण झाली आहे.
कोगनोळी पासून हणबरवाडी, दत्तवाडी, हंचिनाळ, सुळकुड यासह वाडी वस्ती वर रोजंदारी व रोजच्या जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी महिला ये-जा करत असतात. पण कोगनोळी नजीकच हंचिनाळ व दत्तवाडी येथे मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्याने महिलांच्यात घबराहट निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर मोटरसायकल वरून येऊन मंगळसूत्र चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांना अटक करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांतून होत आहे.