खुल्या भवनाची मागणी; उद्यान, सभागृहाचे स्वप्न अधुरे
निपाणी (वार्ता) : इंग्रजांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी १९४२ साली क्रांती लढा झाला. त्यामध्ये निपाणी आणि परिसरातील क्रांतिकारकही सहभागी झाले होते. या लढ्यावेळी झालेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाले तर शंकर पांगीरे हे तरुणपणी हुतात्मा झाले. त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी येथील जळगाव नाक्यावरील पोलीस ठाणे परिसरात हुतात्मा स्मारक उभारले आहे. पण अनेक वर्षापासून हे स्मारक सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेतच आहे.
स्मारकाजवळ दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन कार्यक्रम करून हुतात्मा शंकर पांगिरे यांना अभिवादन केले जाते. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला उजाळा दिला जात आहे. क्रांती लढ्यावेळी अनेक क्रांतिकारकांनी सरकारी खजिना लुटणे, टपाल कार्यालय जाळण्यासह प्रभात फेरी काढली. त्यावेळी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात बेळगाव नाक्यावर स्मारकाच्या ठिकाणीच शंकर पांगिरे हे धारातीर्थी पडले होते.
यापूर्वी स्वातंत्र्यसैनिकांतर्फे कार्यक्रम केला जात होता. पण वर्षानुवर्षे त्यांची संख्या घटत गेल्याने गेल्या २९ वर्षापासून दिग्विजय युथ क्लबतर्फे हुतात्मा दिनी अभिवादनाचा कार्यक्रम होत आहे.
स्मारक परिसराचे सुशिक्षित, खुले सभागृह, परिसरात उद्यान, वृद्ध नागरिकांना बसण्यासाठी बाकडी ठेवण्याची मागणी अनेक वर्षापासून क्लबतर्फे नगरपालिकेकडे केली जात आहे. मध्यंतरी माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर आणि सभागृहाने स्मारक परिसरात पेवर ब्लॉक घालण्यात आले. त्यानंतर सुशीलकरणाचे कोणतेच काम न झाल्याने देश प्रेमी नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. या परिसराचे सुशोभीकरण करण्याचे आश्वासन अनेकांनी दिले आहे. पण त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. शिवाय सध्याच्या पिढीला त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे, यासाठी स्मारक परिसराचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी होत आहे.
——————————————————————–
‘क्रांती लढ्यातील हुतात्मा शंकर पांगिरे यांचे चिरंतन स्मरण व्हावे, यासाठी हुतात्मा स्मारक उभारले आहे. अनेक वर्षापासून क्लबतर्फे अभिवादनाचा कार्यक्रम होत आहे. तरी स्मारकाचे सुशोभीकरण व्हावे, अशी अपेक्षा आहे.’
– दीपक इंगवले, संस्थापक अध्यक्ष, दिग्विजय युथ क्लब, निपाणी