प्राचार्य एम. एस. कामत : कुर्ली हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती
निपाणी (वार्ता) : कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य सर्व जाती-धर्मांसाठी होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महाराजा सयाजीराव, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा वारसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्मवीर आण्णांनी उभारला. ते सत्यशोधकी व मानवतावादी असून शैक्षणिक क्षेत्रातील रयतेचे तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षी होते, असे मत संकेश्वर येथील ए. बी. पाटील पब्लिक स्कूलचे प्राचार्य एम. एस. कामत यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक व्ही. ए. पुजारी होते.
पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व मिरवणुकीचे उद्घाटन ग्राम पंचायत अध्यक्षा सोनाली प्रताप, अरुण निकाडे व वकील संजय शिंत्रे यांच्या उपस्थितीत झाले. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा, प्रबोधन फलक व घोषणा देत गावातून सवाद्य मिरवणूक काढली. विद्यार्थीनींनी लाटीकाटीचे प्रात्यक्षिक व राजगिरी मित्र मंडळ यांनी पारंपारिक लेझीम खेळाचे उत्कृष्ट सादरीकरण केले.या जयंतीच्या पूर्व संध्येला गावात स्वच्छता करून रांगोळी काढल्या होत्या.
मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. शुभदा कोकणे, अक्षदा निकाडे, समीक्षा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ए. ए. चौगुले यांनी अहवाल वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.
यावेळी माजी मुख्याध्यापक जी. टी. वैराट, एम. एच. बरगाले, बी. एस. पाटील, एस. बी. शेडबाळे, एस. डी. वडराळे, स्कूल बेटरमेंट कमिटी सदस्य रामचंद्र निकाडे, जी. जी. निकाडे, बी. जी. पाटील, आप्पासाहेब लोकरे, सीताराम चौगुले, शिवाजी मगदूम, रणजित माने, शिवाजी चौगुले, लक्ष्मण नेजे, कुमार माळी, नामदेव निकाडे, अप्पासाहेब पाटील उपस्थित होते. एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन तर टी. एम. यादव यांनी आभार मानले.