बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. बेळगाव महानगरपालिकेत कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या नागरी सेवकांनी सोमवारी हाताला काळ्या फिती बांधून व सफाई कामगार दिनावर बहिष्कार टाकून, कायमस्वरूपी भरती करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली.
दीड वर्षापूर्वी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेत कायम करण्याचे आदेश शासनाने दिले असतानाही अद्याप त्यांना महापालिकेत कायम करण्यात आलेले नाही, अशी तक्रार यावेळी सफाई कामगारांनी केली. सफाई कर्मचारी संघटनेचे सचिव याबाबत बोलताना म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून कायमस्वरूपी नियुक्ती न झालेल्या 100 नागरी कर्मचाऱ्यांना बेळगाव मनपाने भरती आदेशाची प्रत जारी केलेली नाही. मागील 7 महिन्यांपासून १५४ सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. थकीत वेतन तातडीने देण्यात यावे, सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, यासाठी मनपा जबाबदार असेल असा इशारा त्यानीं दिला. या आंदोलनात विजय नीरगट्टी, मुनिस्वामी भंडारी, दिपक वाघेला, मंजुळा हादिमानी, यल्लावा तळवार आदी सहभागी झाले होते.