निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील डॉ. निखिल संजय पंतबाळेकुंद्री यांनी प्रथम क्रमांक पटकावून ७ सुवर्णपदके मिळवत एम. डी. (डॉक्टर ऑफ मेडिसिन) पदवी पूर्ण केली. त्यानंतर वर्धा-नागपूर येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (जेएनएमसी) येथे झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांना सन्मानित करण्यात आले.
पदव्युत्तर दिक्षांत समारंभात एएफएमसीच्या व्हाइस एडमिरल डॉ. आरती सरीन आणि अदानी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदानी, चेअरपर्सन सागर मेघे, व्हॉइस चान्सलर डॉ. ललित वाघमारे यांच्या हस्ते त्यांना डिग्री प्रमाणपत्रव सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. वर्धा येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज व आचार्य विनोबा भावे रुग्णालय येथे तीन वर्षाचे प्रशिक्षण व परीक्षा झाली होती.
एमबीबीएस शिक्षण मुंबई येथील शासकीय ग्रँट मेडिकल कॉलेज व जे.जे. रुग्णालय येथे झाले. त्यावेळी उत्कृष्ट क्रमांक पटकावला. तसेच टाटा फाउंडेशन व एनएस फाउंडेशनची तीन वर्षाची स्कॉलरशिप सुद्धा मिळवली आहे. अक्कोळ सारख्या ग्रामीण भागात राहून एम.डी परीक्षेतील दैदिप्यमान यशाबद्दल डॉ. निखिल पंतबाळेकुंद्री यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील दोन महिन्यात सुपर स्पेशलिटी (एमडी) उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे.