Sunday , June 28 2026
Breaking News

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निपाणीवासीयांचा घसा कोरडा

Spread the love

 

पाणीप्रश्न न सोडविल्यास राजकारणातून संन्यास; माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांचा इशारा

निपाणी (वार्ता) : जवाहर तलावासह वेदगंगा नदीत पाणीसाठा अत्यल्प असताना आपल्या नगराध्यक्ष पदाच्या काळात शहरवासीयांना भर उन्हाळ्यातही मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला होता. सध्या नदीसह तलावात पाणी असताना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे. अनेक वर्षापासून पाणी प्रश्नी जेवढा त्रास झाला नाही इतका त्रास या दोन महिन्यात निपाणी शहरवासीयांना होत आहे. पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. या प्रश्नी विद्यमान आमदार आणि खासदारांनी दुर्लक्ष केले आहे. पाणी प्रश्न राजकारण न करता सर्वांना एकत्रीत घेवून पाणी पुरवठा सुरळीत करणे गरजेचे होते. याकरीता सर्वपक्षीय बैठक घेऊन पाणी समस्या तुम्ही निकालात काढा. जमत नसेल तर आम्ही काढतो. पाणी प्रश्न आमच्याकडून निकालात निघाला नाही तर राजकारणातून संन्यास घेवू, असा इशारा माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासूनच्या काळात असा निपाणीचा पाणी प्रश्न जटील झाला नव्हता. मात्र या पाणी प्रश्नाकडे गांभीर्यान कोणाचेही लक्ष नाही. किरकोळ कामाच्या उद्घाटनासाठी श्रेयवाद घेणारी ही मंडळी पाणी प्रश्नाकडे पाहण्यासाठी दुर्लक्ष करीत आहेत. नदीला पाणी सोडण्याचे प्रसिध्द करण्याची गरज नाही. कारण २००१ साली तत्कालीन मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा, विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उर्जामंत्री वीरकुमार पाटील व आम. काकासाहेब पाटील यांनी काळम्मावाडी कराराची पूर्तता केल्याने आम्हाला हक्काचे २.७५ टीएमसी पाणी मिळते. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी करण्याची गरज नाही. वेदगंगेत पाणी आहे, तलावात पाणी आहे. पण लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.
टॉयलेटचे उद्घाटन करता येते, आम्ही केलेल्या योजनांचे वितरण करता येते पण पाणी प्रश्नाकडे लक्ष देता येत नाही, हे निपाणीकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
पालकमंत्री सतिश जारकिहोळी यांच्याकडे आपण निपाणीचा कायमचा पाणी प्रश्न निकालात काढता यावा, याकरीता यरनाळ हद्दीत नवीन तलाव निर्मितीची मागणी केली होती. याकरीता शासनाकडून १७५ कोटीची मागणी केली होती. दोन वर्ष झाली. पण या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. मागणीचे महत्व लक्षात घेतले जात नाही. आजही आपण टिका करीत नसून ही वस्तूस्थिती आहे. कारण निपाणीतील ज्येष्ठ मंडळींनी ७५ वर्षापूर्वी जवाहरलाल तलावाची निर्मिती केली. त्यांनी निपाणीकरांसाठी भरीव काम केले आहे. अशा प्रकारे काम होणे गरजेचे असून रस्ते, गटारी, स्वच्छता होईल पण भरीव काम होणे गरजेचे आहे. ८ ते १० दिवसातून पाणी येत आहे. त्याकडे लक्ष द्या. त्याकरीता एकत्रीत बैठक बोलवा.
तुम्ही पाणी प्रश्न सोडवा, तुम्हाला जमत नसेल तर आम्ही सोडवितो. पाणी प्रश्न सोडविला नाही तर राजकारणातून संन्यास घेतो. अधिकाऱ्यांच्याकडे लक्ष द्या. एकिकडे आम्ही अधिकाऱ्यांच्यावर अंकुश ठेवतो तर ते त्या अधिकाऱ्यांना पाठीमागून फुस लावतात हा प्रकार निपाणीकरांसाठी त्रासदायक असल्याचे विलास गाडीवड्डर यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती बाळासाहेब देसाई सरकार, डॉ. जसराज गिरे, विनोद चोरगे, विकास जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘अग्नि सुरक्षा’ प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Spread the love    निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *