Wednesday , May 6 2026
Breaking News

शहर समिती अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग; निष्ठावंत नेतृत्वाची मागणी

Spread the love

 

बेळगाव : दीपक दळवी यांच्या निधनानंतर मध्यवर्ती तसेच शहर समितीचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. दरम्यान, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची नुकतीच सर्वानुमते निवड झाली आहे. मात्र शहर समितीचे अध्यक्षपद अद्याप रिक्त असून, या पदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे.
समितीच्या राजकारणात शहर समितीच्या अध्यक्षपदाला विशेष महत्त्व आहे. आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता, हे पद आपल्या मर्जीतील व्यक्तीकडे असावे, अशी अनेकांची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने विविध स्तरांवर हालचाली सुरू असून, काही इच्छुकांच्या समर्थकांकडून अनौपचारिक कार्यक्रम अर्थात ओल्या पार्ट्या आणि बैठका आयोजित केल्या जात असल्याची चर्चा आहे. तसेच काहींनी माजी लोकप्रतिनिधींच्या नावांची चर्चा पुढे आणण्याचाही प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
नवीन अध्यक्ष निवडताना सीमालढ्याचा अंतिम टप्पा लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. न्यायालयीन लढ्यासोबतच संघटनात्मक कामकाजात सक्रिय असलेला, प्रामाणिक व निष्ठावंत, तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा नेता निवडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गरज भासल्यास दिल्ली आणि मुंबई येथे जाऊन सीमाप्रश्नासाठी पाठपुरावा करणारा, समितीच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग घेणारा आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा युवा अध्यक्ष असावा, अशी मागणी होत आहे.
याच पार्श्वभूमीवर समितीतील काही गट पुन्हा सक्रिय झाल्याचेही दिसून येत आहे. स्वतःला समितीनिष्ठ म्हणवून घेणाऱ्या काही घटकांकडून संघटनेतील सूत्रे आपल्या हातात ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. निवडणुका जवळ आल्यावर अशा हालचालींना वेग येत असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.
शहर समितीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असून, काही ठिकाणी प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होत असल्याचेही समजते. या पार्श्वभूमीवर समितीच्या नेतृत्वाने अध्यक्ष निवडीचा विषय गांभीर्याने घेत, निष्ठावंत आणि समर्पित कार्यकर्त्याच्या हाती शहर समितीची धुरा सोपवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांतून जोर धरत आहे.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर परिसराला वादळी वाऱ्यामुळे झाड आणि खांब कोसळून विस्कळीत झालेली वाहतूक अडीच तासानंतर पूर्ववत

Spread the love  येळ्ळूर : मंगळवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे येळ्ळूर परिसरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *