


फुलपाखरांचे संवर्धन करा: वृक्षतोडीमुळे संख्या घटली
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात बेसुमार वृक्षतोडीने फुलपाखरांचे खाद्य वनस्पती कमी होत आहे. नागरिकांमधील अनभिज्ञतेमुळे गेल्या १५ वर्षांमध्ये निपाणी विभागात ७० टक्क्यांनी फुलपाखरांची संख्या घटली आहे. त्यामुळे यंदाच्या दसऱ्याला आपट्याच्या झाडे, फांद्या तोडण्यापेक्षा आपट्याची रोपे वाटण्याची अपेक्षा पर्यावरण प्रेमी नागरिकांतून होत आहे. काही वर्षांमध्ये आपट्यांच्या फांद्यांची तोड होत असल्यामुळे ट्रायकलर पाइड फ्लॅट (तिरंगी प्रतल), ब्लॅकराजा (कृष्ण नरेश), एमियंट (भटक्या) या तीनफुलपाखरांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे या दसऱ्यानिमित्त आपट्याची पाने न वाटता आपट्याची रोपे वाटून फुलपाखरांचे संवर्धन करावे.
ट्रायकलर पाइड फ्लॅट (तिरंगी प्रतल), ब्लॅकराजा (कृष्ण नरेश), एमिग्रंट (भटक्या) या तीन प्रजातीतील फुलपाखरे आपट्याच्या झाडावर अंडी घालून त्यातून अळी बाहेर येते. आणि आपट्याची कोवळी पाने पाने खाऊन झाल्यावर ती स्वतःचे रूपांतर कोषात करते. दसऱ्याच्या दिवशी खुडलेल्या आपट्याच्या पानांवर शेकडो अंडी, अळ्या असतात. दसरा आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी ही पाने निर्माल्यात आढळतात.
——————————————————————–

‘अमेझॉन, ऑस्ट्रेलियात लागलेले वणवे आणि वर्षानुवर्षे सण समारंभांच्या निमित्ताने फुलपाखरांचा होणारा वंशनाश यांची दाहकता तेवढीच आहे. त्यामुळे आपट्याची पाने वाटण्यापेक्षा एखादे रोपटे दिल्यास फुलपाखरांचे संवर्धन होईल.’
-फिरोज चाऊस, अध्यक्ष, सृष्टी पर्यावरणवादी संघटना,निपाणी
—
Belgaum Varta Belgaum Varta