बेळगाव : जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्ताने सिध्दार्थ बोर्डिंग शहापूर यांच्यावतीने डॉक्टर रवि मुन्नवळ्ळी यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. डॉ. मुन्नवळ्ळी यांच्या दवाखान्यात आयोजित या सत्कार समारंभात प्रास्ताविक करताना स्वातंत्र सैनिक गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी डॉक्टर हेच आजच्या समाजाचे खरे देव आहेत. तेच या समाजाला तारणारे आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेणे फार महत्वाचे आहे. आजचा हा सत्कार समारंभाच्या आयोजनाचा मूळ उद्देश डॉक्टरांचे मनोबल वाढवून त्यांनी करत असलेल्या कार्याचे कौतुक करणे हा आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक नेताजी जाधव उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जैन पी यू कॉलेजचे प्रा. भरमा कोलेकर व माजी प्राचार्य सुरेंद्र देसाई हे उपस्थित होते. यावेळी गरिबांचा डॉक्टर म्हणून शहापूर परिसरात परिचित असलेले डॉ. रवि मुन्नवळ्ळी व त्यांच्या सहकार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सिध्दार्थ बोर्डिंगचे चेअरमन संतोष होंगल, उपाध्यक्ष हिरालाल चव्हाण, गोपीनाथ मुचंडी, मारुती कांबळे, मल्लया हिरेमठ हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या संयोजिका सिध्दार्थ बोर्डिंगच्या व्यवस्थापिका सौ. पवित्रा हिरेमठ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
