नवी दिल्ली : बीसीसीआयने भारताचा टी-२० संघ निवडताना रोहित शर्माला डच्चू दिल्याचे पाहायला मिळाले. रोहित आता भारताच्या टी-२० संघात दिसणार नाही, असे म्हटले जात आहे. पण रोहितनंतर आता प्रशिक्षक राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनाही डच्चू मिळणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
राहुल द्रविड यांनी भारताचे प्रशिक्षकपद सांभाळल्यावर संघात मोठे बदल केले होते. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे सात कर्णधार पाहायला मिळाले. त्यानंतर आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला चांगली कामगिरी करता आली नाही. द्रविड जेव्हा संघाबरोबर नसायचे तेव्हा लक्ष्मण हे प्रशिक्षकाच्या भूमिकेत असायाचे. पण आता बीसीसीआयने द्रविड आणि लक्ष्मण यांना संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने आता पुढल वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी बीसीसीआयने भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार बदलला आहे. रोहितच्या जागी आता हार्दिक पंड्याला भारतीय संघाचे कर्णधार केले आहे. त्यानंतर बीसीसीआय आता टी-२० संघाचे प्रशिक्षकही बदलणार असल्याचे समोर येत आहे. बीसीसीआय आता भारताच्या टी-२० संघासाठी परदेशी प्रशिक्षक निवडणार असल्याचे संकेत मिळाले आहे. यासाठी महेला जयवर्धने यांचे नाव चर्चेत होते. पण मुंबई इंडियन्सची जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळे ते हे पद स्विकारणार नसल्याचे समोर आले होते. पण बीसीसीआय जयवर्धने यांच्यासाठी आग्रही असेल. जर जयवर्धने यांनी नकार दिला तर बीसीसीआयपुढे स्टीफन फ्लेमिंग हा एक पर्याय उपलब्ध आहे. फ्लेमिंग हे न्यूझीलंडचे माजी कर्णधार होते, त्याचबरोबर आयपीएलमध्ये ते अजूनही चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षकपद भूषवत आहेत. पण फ्लेमिंगही चेन्नईच्या संघाचे प्रशिक्षकपद सोडतील, असे दिसत नाही. त्यानंतर बीसीसीआयपुढे अँडी फ्लॉवर यांचा भारताच्या प्रशिक्षकपदासाठी विचार करत आहे. आतापर्यंत अँडी यांनी इंग्लंडच्या संघाचे प्रशिक्षकपद भुषवले होते. सध्याच्या घडीला ते आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. लखनौच्या संघाला या आयपीएलमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नसली तरी त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर बीसीसीआय विचार करू शकते, असे सध्या पाहायला मिळत आहे.