Wednesday , July 9 2025
Breaking News

चेन्नईचा गुजरातवर ६३ धावांनी विजय

Spread the love

 

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने गुजराट टायटन्सवर ६३ धावांनी एकतर्फी विजय मिळवला. सामन्याच्या सुरूवातीपासूनच चेन्नईने आपली पकड कायम ठेवली होती. गुजरात संघाने नाणेफेक गमावत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण तो काही फायदेशीर ठरला नाही. चेन्नईने सुरूवातीपासून आक्रमक पवित्रा घेत धावांचा पाऊस पाडला. सीएसकेच्या प्रत्येक फलंदाजाने धावफलकात आपले योगदान दिले आणि संघाची धावसंख्या २०६ वर नेऊन ठेवली. गोलंदाजीतही चेन्नईने आपली चमक दाखवत गुजरातच्या फलंदाजांना टिकू दिले नाही. दोन नव्या युवा कर्णधारांच्या मुकाबल्यात ऋतुराज गायकवाडने बाजी मारली.

गुजरातच टायटन्सचे फलंदाज या सामन्यात अयशस्वी ठरले. साई सुदर्शन वगळता एकाही फलंदाजाला ३० चा आकडाही गाठता आला नाही. साई सुदर्शनने ३१ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. संघाचे दोन्ही सलामीवीर शुबमन गिल (८) आणि रिध्दिमान साहा (२१) हे मोठी खेळी करू शकले नाही, याचा संघाला फटका बसला. या दोघांनाही दीपक चाहरने बाद केले. त्यानंतर मिचेलच्या गोलंदाजीवर धोनीने झेप घेत एक जबरदस्त कॅच पकडली आणि विजय शंकरला (१२) बाद केले. धोनीच्या या कॅचचा व्हीडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे.

डेव्हिड मिलरही मोठी कामगिरी करू शकला नाही आणि तो २१ धावा करत देशपांडेच्या गोलंदाजीवर बाद झाला. धोनीनंतर रहाणेने सुध्दा एक कमाल झेल टिपला. तर ओमरजाईदेखील ११ धावांवर खेळत असताना देशपांडेकडून झेलबाद झाला. यानंतर राहुल तेवतिया (६) आणि राशीद खान (१) यांना मुस्तफिझूर रहमानने झेलबाद केले. हे दोन्ही झेल रचिन रवींद्रने घेतले. उमेश यादवने १ षटकार लगावत १० धावा केल्या तर जॉन्सने ५ धावा केल्या. एकंदरीतच गुजरातचे फलंदाज फेल झाल्याने संघाला तब्बल ६३ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.

तत्पूर्वी गुजरातने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण चेन्नईच्या फलंदाजांच्या फटकेबाजीला आळा घालण्यात ते अपयशी ठरले. सलामीवीर रचिन रवींद्रने तर इतक्या वेगाने धावा केल्या जणू काही बॅटला स्प्रिंग लावून आला होता. चेंडू आला की तो थेट सीमारेषेबाहेरच. रचिनने २० चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. अवघ्या ४ धावांनी त्याचे पहिले अर्धशतक हुकले. राशीद खानच्या गोलंदाजीवर त्याला साहाने स्टंपिंग करत बाद केले. त्यानंतर ऋतुराजने फटकेबाजी सुरू केली आणि त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावा केल्या. अजिंक्य रहाणे मात्र १२ धावा करत स्वस्तात बाद झाला. पण तो बाद झाला तरी संघाच्या धावांना ब्रेक नाही लागला.

रहाणेनंतर आलेल्या शिवम दुबेने पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला आणि बाद झाल्यानंतरच तो शांत झाला. दुबेने २३ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकारांसह ५१ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर घोषित केले. डॅरिल मिचेल २४ धावा करत नाबाद राहिला. पण या सगळ्यांसोबतच पहिला आयपीएल सामना खेळणारा समीर रिझवीने षटकारांने आपले खाते उघडले आणि ६ चेंडूत २ षटकारांसह १४ धावा करत बाद झाला. मोहित शर्माने त्याला मिलरकडून झेलबाद केले. तर जडेजा ७ धावा करत धावबाद झाला. गुजरातकडून राशीद खानने २ विकेट तर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्माने १ विकेट घेतली. तर आयपीएलमधील सलग दुसरा विजय नोंदवणाऱ्या चेन्नईकडून दीपक चाहरने २, तुषार देशपांडे २ आणि मुस्ताफिजूर २ विकेट्स घेतले. तर मिचेल आणि पाथिरानाला एक विकेट घेण्यात यश मिळाले.

About Belgaum Varta

Check Also

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएल 2025 चा चॅम्पियन!

Spread the loveअहमदाबाद : 18 वर्षे… एक दीर्घ प्रतीक्षा, असंख्य अपेक्षा आणि लाखो चाहत्यांचा अटळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *