मुंबई : पुढील महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाला नवीन कोच मिळणार आहे. यासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली असून सोमवारी नवीन प्रशिक्षकपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचा कोच आहे. त्याचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता. तो देखील इच्छुक असेल तर अर्ज करू शकणार आहे.
बीसीसीआयने साडे तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले आहेत. बोर्डाने अर्जासाठी २७ मे ही अखेरची तारीख ठेवली आहे. यानंतर निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यामध्ये मुलाखत आणि मुल्यांकन केले जाणार आहे. यानंतरच प्रशिक्षकाची निवड केली जाणार आहे.
नवीन प्रशिक्षक हा १ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या काळासाठी असणार आहे. बीसीसीआयने कोचच्या निवडीसाठी काही अटी ठेवल्या आहेत. यानुसार प्रशिक्षक पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे, कमीतकमी ३० कसोटी, ५० वनडे सामने खेळण्याचा अनुभव असावा तसेच कमीतकमी दोन वर्षांचा एखाद्या पूर्णवेळ संघाचा प्रशिक्षक पदाचा अनुभव असावा, अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत.