पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावले.
भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरे कांस्य पदक आहे. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे.